राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले आहे. सहा दिवस चालणार्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. 'राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल कि संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत'असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप यावरून अधिवेशनात सरकारची कोंडी केली जाणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आणि विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकेचा भडीमार चालविला असताना रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. पुलवामा मढील हल्लयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चहापानाचा कार्यक्रम आयोजित कसा करू शकतात. असा सवाल करीत विरोधकांनीं त्यावर बहिष्कार टाकला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या एक आठवड्याच्या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणूक डोळ्यसमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयोग करण्याची शक्यता असून राज्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणांची पुनरावृत्ती केली जाईल अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच या सरकारच्या काळात २०१५ पासूनआतापर्यन्त १२ हजार २२७ शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे अटी आणि नियमांच्या जंजाळात अडकलेल्या शेतकऱ्यांची सरकारने माफी मागावी आणि २०१८न पर्यन्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतकयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विखे यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.